श्री माताजी परिचय

सहजयोग

सहज योगाच्या प्रणेत्या श्रीमाताजी निर्मला देवी यांचा जन्म २१ मार्च १९२३ रोजी छिंदवाडा येथे, पैठणच्या शालिवाहन कुळात मध्यान्ह वेळी झाला. छिंदवाडा शहर भारताच्या मध्यभागी असून २१ मार्च रोजी दिवस व रात्र समान असतात. असे हे संतुलन योगायोग नसून ते नियतीचे कार्य होते. श्री माताजींचा जन्म हे अवतरण होते आणि भृगु ऋषींनी याविषयीची भविष्यवाणी दोन हजार वर्षांपूर्वीच केली होती. त्यांचे बालपण अतिशय आनंदात गेले.

थोड्या मोठ्या झाल्यावर श्री माताजी गांधीजींच्या आश्रमात जात असत. गांधीजींच्या त्या लाडक्या होत्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्या लाहोरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. मात्र ब्रिटिशांच्या रोषामुळे ते अपूर्ण राहिले. ७ एप्रिल १९४७ रोजी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्री चन्द्रिका प्रसाद श्रीवास्तव यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. या काळात धर्म मार्तंड व स्वतःला भगवान म्हणून घेणाऱ्यांनी सर्व ताबा घेतला होता. त्यांचे उद्देश व आचरण यामध्ये फरक होता.

सर्वसामान्य माणसे यामुळे द्विधा मनस्थितीत अडकायचे. पूर्वेकडे संस्कारांचा प्रश्न होता आणि पश्चिमेकडे अहंकाराचा प्रश्न होता. परिस्थितीचा आढावा घेऊन श्री माताजी विचार करीत होत्या की असंख्य साधकांना आत्मसाक्षात्कार कसा देता येईल? यासाठी त्या गुजरात राज्यातील नारगोळ येथे गेल्या. तेथे समुद्रकिनारी रात्रभर तपश्चर्या केली आणि सहस्रार उघडले .ही एक दैवी घटना होती. दिनांक ५ मे १९७० रोजी विश्वाचे सहस्त्रार उघडल्यामुळे सामूहिक आत्मसाक्षात्कार आणि कुंडलिनी जागृती या गोष्टी सहज शक्य झाल्या.